मुंबई: अनुसूचित जाती, जमातींचे उप वर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त निकालाच्या निषेधार्थ उत्तर भारतातील अनेक दलित संघटनांनी येत्या बुधवारी २१ ऑगस्ट रोजी ' भारत बंद ' ची हाक दिली आहे. त्याला महाराष्ट्रातील आंबेडकरवादी संघटनांनी प्रतिसाद दिला असून त्यासाठी जोरदार तयारी जिल्ह्या - जिल्ह्यात सुरू झाली आहे.
मुंबईत ' आंबेडकरवादी भारत
मिशन ' तर्फे भारत बंदच्या दिवशी आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी दलित संघटनांची एक बैठक शनिवारी मुंबईतील प्रेस क्लब मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आझाद मैदानात ' दलित एकता धरणे ' आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माहिती बैठकीचे निमंत्रक दलित पँथरचे नेते सुरेश केदारे आणि ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
या बैठकीला रिपाइं ( सेक्युलर) चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते सयाजी वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, समाजवादी पार्टीचे राज्य महासचिव राहुल गायकवाड , ॲड. जयमंगल धनराज, सतीश डोंगरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे, मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगेश पगारे, दिवंगत रामविलास पासवान यांच्या दलित सेनेचे नेते रवी गरुड, सी पी आय एम एल ( लिब्रेशन) नेते श्याम गोहिल हे नेते उपस्थित होते.
मुंबईत आंबेडकरी बालेकिल्ले अशी ओळख असलेल्या वसाहतींमधील अनेक आंबेडकरवादी कार्यकर्ते या बैठकीला आवर्जुन उपस्थित होते. त्यात भगवान गरुड, भीमराव चिलगावकर, शरद कांबळे, जयवंत हिरे, संजय जगताप, सचिन वानखेडे , विनोद ढोके, दीपक चौगुले यांचा प्रामुख्याने समावेश होता.









